Skip to main content
Install App
If you're using:

वैयक्तिक अंतर आणि सुरक्षितता शिकवण्यासाठी वापरले जाणारे एक सोपे चित्र — सोशल सर्कल्स

Default Avatar

Nayi Disha Team

Also available in: हिंदी English

Key Takeaways:

  1. चित्रांचा वापर करा: वेगवेगळ्या रंगांचे सोशल सर्कल्स  वापरून ओळखीची पातळी दाखवा (कुटुंब, मित्र, ओळखीचे लोक, अनोळखी).
  2. नातेसंबंध सोपे करा: कोण किती जवळचा आहे आणि प्रत्येकाशी कसं वागायचं हे मुलाला शिकवा.
  3. स्पष्ट मर्यादा ठरवा: प्रत्येक वर्तुळासाठी वैयक्तिक अंतर व सुरक्षिततेचे नियम समजावून सांगा (कोण मिठी मारू शकतो, कोण फक्त हात मिळवू शकतो, कोणापासून दूर राहायचे).
  4. भूमिका अभिनय करा: वेगवेगळ्या प्रसंगांचे उदाहरण देऊन सराव करा.
  5. पुन्हा पुन्हा आठवण करून द्या: रोजच्या प्रसंगांत सोशल सर्कल्सची संकल्पना पुन्हा समजावून द्या.

मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांना निरोगी सामाजिक नाती निर्माण करता यावीत यासाठी वैयक्तिक अंतर (personal space) आणि मर्यादा (boundaries) समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
विशेषतः ज्यांना संवाद, सामाजिक वर्तन किंवा संवेदनांशी (sensory processing) संबंधित अडचणी असतात  अशा मुलांच्या अपेक्षित असलेल्या पण न दिसणाऱ्या मर्यादा इतर लोकांना समजणे कठीण जाऊ शकते.हा लेख “सोशल सर्कल्स” नावाचे एका सोप्या आणि उपयोगी चित्रात्मक साधनाची ओळख करून देतो. या साधनाच्या मदतीने केअरगिव्हर्स मुलांना वैयक्तिक अंतर आणि नात्यांच्या मर्यादा स्पष्ट, सहानुभूतीने आणि आदरपूर्वक समजावून सांगू शकतात

वैयक्तिक अंतर म्हणजे काय आणि ते का महत्त्वाचे आहे?

वैयक्तिक अंतर म्हणजे आपण इतर लोकांपासून ठेवलेले शारीरिक आणि भावनिक अंतर. हे अंतर त्या व्यक्तीला आपण किती ओळखतो आणि आपल्याला त्यांच्याबरोबर किती आरामदायक वाटते यावर अवलंबून असते. विशेषतः जे बोलू शकत नाहीत किंवा वेगळ्या पद्धतीने संवाद साधतात अशा मुलांना इतरांबरोबर किती जवळ जायचे हे समजणे किंवा सांगणे कठीण जाऊ शकते.

अशा वेळी, वेगवेगळ्या नात्यांमध्ये किती जवळ किंवा दूर राहायचे हे मुलांना शिकवणे खूप महत्त्वाचे ठरते. हे शिकणे फक्त सुरक्षिततेसाठी नाही, तर मुलांना स्वतःच्या सामाजिक जगात सुरक्षित आणि आत्मविश्वास वाटण्यासाठीही आवश्यक आहे.

सोशल सर्कल्स (Social Circles) म्हणजे काय?

सोशल सर्कल्स हे रंगांच्या मदतीने समजावणारे एक सोपे चित्रात्मक साधन आहे. यामध्ये वेगवेगळ्या वर्तुळांद्वारे लोकांशी असलेली ओळख आणि त्यांच्याशी कसे वागायचे हे दाखवले जाते.
मुलांना हे चित्र दाखवून, कोण कोणत्या वर्तुळात येते आणि वेगवेगळ्या सामाजिक परिस्थितींमध्ये कसे वागावे हे समजावता येते.

हे साधन विशेषतः दृश्य पद्धतीने शिकणाऱ्या किंवा ठरावीक मार्गदर्शनाची गरज असलेल्या मुलांसाठी खूप उपयुक्त आहे.

वर्तुळांची समज (Understanding the Circles)

आता सुरक्षा  नावाच्या एका मुलीच्या उदाहरणातून प्रत्येक रंगाचे वर्तुळ काय दर्शवते ते पाहूया.

जांभळे वर्तुळ: स्वतःचे खास जग

  • हे सर्वात आतले वर्तुळ आहे, यात फक्त मूल स्वतः असते.
  • हे त्यांच्या शरीराचे आणि खासगीपणाचे स्थान आहे.
  • परवानगीशिवाय कोणीही या जागेत येऊ नये किंवा स्पर्श करू नये.
  • यामुळे मुलांना स्वतःच्या शरीरावर हक्क आहे हे समजते.

निळे वर्तुळ: कुटुंब आणि विश्वासू काळजीवाहक

  • आई-वडील, भावंडे आणि घरात राहणारे किंवा रोज काळजी घेणारे लोक.
  • मूल आरामात असेल तर मिठी किंवा प्रेम दाखवू शकते.
  • पण काहीही अस्वस्थ वाटले तर कुटुंबालाही “नाही” म्हणण्याचा अधिकार आहे हे शिकवले जाते.

 हिरवे वर्तुळ: मित्र

  • ज्यांच्यासोबत मुलाला वेळ घालवायला आवडतो, खेळायला किंवा अभ्यास करायला आवडते जसे शाळेतील मित्र.
  • प्रत्येकाशी जवळीक वेगवेगळी असू शकते. टाळ्या देणे, जवळ बसणे असे शारीरिक संपर्क फक्त तेव्हा करावेत, जेव्हा मुलाला सुरक्षित वाटते आणि ते त्यासाठी तयार असेल.

पिवळे वर्तुळ: ओळखीचे लोक

  • मुलाला नेहमी दिसणारे पण फारसे ओळखीचे नसलेले लोक, जसे शेजारी, ज्या वर्गमित्रांशी ते जास्त बोलत नाही, किंवा पालकांचे मित्र.
  • यांच्याशी नम्र आणि आदराने  बोलणे असते, पण शारीरिक जवळीक खूप मर्यादित असते.

नारंगी वर्तुळ: समाजातील मदत करणारे लोक

  • यामध्ये डॉक्टर, शिक्षक, ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक असे लोक येतात.
  • हे लोक महत्त्वाचे असतात, पण ते आपले जवळचे मित्र किंवा कुटुंबीय नसतात.
  • मुलांना समजावणे गरजेचे आहे की हे लोक आपल्याला ठरावीक प्रसंगी मदत करतात. गरज नसल्यास त्यांच्याशी जवळचा शारीरिक संपर्क ठेवण्याची आवश्यकता नसते (उदा. वैद्यकीय तपासणीदरम्यान — तीही फक्त परवानगीने).

लाल वर्तुळ: अनोळखी लोक

  • हा सगळ्यात बाहेरचा वर्तुळ आहे.
  • मुलाला अजिबात ओळख नसलेली माणसं यात येतात.

मुलांना अशा लोकांपासून अंतर ठेवायला, स्वतःची वैयक्तिक माहिती सांगू नये, आणि जर कोणी अनोळखी व्यक्ती जवळ आली किंवा अस्वस्थ वाटले, तर लगेच विश्वासू मोठ्या व्यक्तीकडे मदत मागायला शिकवले पाहिजे.

तुमच्या मुलासोबत हे साधन कसे वापरावे :

  • दृश्य आणि सहभागी पद्धत वापरा:रंगीत चार्ट, चित्रे किंवा गोष्टींची पुस्तके वापरा. प्रत्येक वर्तुळात कोण येते हे ओळखण्यात मुलाला सहभागी करा.
  • खरी उदाहरणे द्या: रोज भेटणाऱ्या लोकांबद्दल बोला आणि ते कोणत्या वर्तुळात येतात ते विचारा.
  • पुन्हा-पुन्हा समजावून सांगा: हे एकदाच सांगून संपत नाही. रोजच्या आयुष्यात हळूच आठवण करून द्या.
  • मुलाच्या सोयीचा आदर करा: प्रत्येक मुलाला जवळीक वेगळी वाटते. जागा मागणे ठीक आहे हे समजवा.
  • सोप्या शब्दांत शिकवा: “मला थोडी जागा हवी आहे”, “कृपया थांबा”, “मला अस्वस्थ वाटते” अशी वाक्ये सराव करा.
  • स्वतः उदाहरण द्या: तुम्हीही प्रेमाने आणि स्पष्टपणे सीमा कशा ठेवता हे दाखवा.

हे का महत्त्वाचे आहे (Why this matters)

सुरक्षा सारखी मुले दिवसभर अनेक लोकांच्या संपर्कात येतात. कधी काही लोकांजवळ त्यांना आरामदायक वाटते, तर कधी अस्वस्थ वाटू शकते. वैयक्तिक मर्यादा समजून घेण्यासाठी आणि सांगण्यासाठी ही सोपी पद्धत त्यांना सुरक्षित, आत्मविश्वासपूर्ण आणि आदरयुक्त वाटायला मदत करते.
पालक, शिक्षक आणि इतर प्रौढांना मुलाच्या संवाद पद्धती आणि निवडी समजून घेण्यासही ही पद्धत मदत करते.

अतिरिक्त सुरक्षितता संसाधने (Additional safety resources)

आभार
सामग्रीचे परीक्षण करून उपयुक्त अभिप्राय दिल्याबद्दल आम्ही Ms. Snigdha Indukuri यांचे आभार मानतो.

ऑटिझम, डाउन सिंड्रोम, ADHD किंवा इतर बौद्धिक/विकासात्मक अडचणींबाबत प्रश्न असतील, किंवा तुमच्या मुलाच्या विकासाबद्दल चिंता असेल, तर नई दिशा टीम मदतीसाठी आहे.
आमच्या मोफत हेल्पलाईनवर कॉल किंवा WhatsApp करा: 844-844-8996
आम्ही इंग्रजी, हिंदी, मल्याळम, गुजराती, मराठी, तेलुगू आणि बंगाली या भाषांमध्ये मदत देतो.

सूचना (Disclaimer)
ही माहिती केवळ मार्गदर्शनासाठी आहे. योग्य सल्ल्यासाठी कृपया पात्र आरोग्य किंवा शिक्षण तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Write Blog

Share your experiences with others like you!

English