Skip to main content
Install App
If you're using:

डाऊन सिंड्रोम असलेल्या व्यक्तींमध्ये नियमित आरोग्य तपासणीचे फायदे

Default Avatar
DSFI
Also available in: English
Like Icon 0Likes
Download Icon 0 Downloads

Key Takeaways:

  1. डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलांमध्ये काही वैद्यकीय समस्या अधिक प्रमाणात दिसून येऊ शकतातपण या समस्या वेळेवर तपासणी सतत देखभालीद्वारे प्रभावीपणे हाताळता येतात.
  2. नियमित आरोग्य तपासणीमुळे भविष्यातील गुंतागुंत टाळता येते आणि योग्य वेळी उपचार सुरू करता येतात.
  3. बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि आवश्यक वाटल्यास विशिष्ट समस्यांसाठी संबंधित विशेषज्ञांकडे पाठवण्याची विनंती करा.
  4. आपल्या मुलाच्या क्षमतांवर, गरजांवर आणि संवेदनक्षमतेवर लक्ष केंद्रित कराप्रत्येक मुलाचा विकास स्वतःच्या गतीने होतो.
  5. तुम्ही एकटे नाहीसमाजामध्ये तुम्हाला आधार, मार्गदर्शन आणि मदत उपलब्ध आहे.
Infographic Image

डाऊन सिंड्रोम (DS) असलेली मुले वेगवेगळ्या कौशल्यांसह, व्यक्तिमत्त्वासह आणि सामर्थ्यासह येतात. त्यांच्यात काही आरोग्यविषयक अडचणी अधिक प्रमाणात आढळू शकतात, पण या अडचणींची माहिती आता चांगल्या प्रकारे उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, या अडचणी वेळेवर ओळखून, सतत निगराणी ठेवून व व्यवस्थापन करून सहज हाताळता येतात.

हा मार्गदर्शक पालक, पालकत्व करणारे नातेवाईक व कुटुंबीयांसाठी आहे — जेणेकरून आरोग्याची निगराणी का महत्त्वाची आहे हे समजून घेता येईल, आणि कोणत्या बाबीकडे लक्ष द्यावे हे ओळखता येईल — जेणेकरून तुमचे मूल निरोगीपणे वाढू शकेल, शिकू शकेल आणि प्रगती करू शकेल.

डाऊन सिंड्रोममध्ये नियमित आरोग्य तपासणी का महत्त्वाची आहे?

डाऊन सिंड्रोम ही एक अनुवंशिक स्थिती आहे, जी शरीरातील विविध प्रणालींवर परिणाम करू शकते. त्यामुळे डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलाला ऐकणे, पाहणे, वाढ, रोगप्रतिकारक शक्ती, पचन किंवा थायरॉईडसारख्या बाबींमध्ये थोडा अधिक आधाराची गरज असू शकते. या गोष्टींची नियमितपणे तपासणी केल्यास गुंतागुंत टाळता येते आणि आवश्यक ती मदत वेळेवर मिळते.

प्रत्येक मुलाला हे सर्व आरोग्यविषयक प्रश्न येतीलच असे नाही, पण आरोग्य तज्ज्ञांशी वेळोवेळी संपर्कात राहिल्यास आपण एक पाऊल पुढे राहू शकतो.

डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलांमध्ये दिसून येणाऱ्या सामान्य आरोग्य अडचणी व आवश्यक तपासण्या

. वारंवार संसर्ग (Recurrent Infections)
त्वचा, मूत्रपिंड किंवा श्वसनमार्गातील संसर्ग वारंवार होऊ शकतात, कारण रोगप्रतिकारक शक्ती थोडी कमी असते.
कोणाकडे सल्ला घ्यावा: बालरोगतज्ज्ञ किंवा इम्युनोलॉजिस्ट
कधी तपासणी करावी: एका हंगामात २–३ वेळा किंवा तीव्र संसर्ग होत असल्यास

. थायरॉईड हार्मोन समस्यां (Thyroid Hormone Concerns)
थायरॉईड हार्मोन कमी असण्याची (Hypothyroidism) शक्यता अधिक असते. याचा परिणाम उर्जा, वाढ व मूडवर होतो.
कोणाकडे सल्ला घ्यावा: बालरोगतज्ज्ञ किंवा एंडोक्रायनोलॉजिस्ट
कधी तपासणी करावी: जन्मतः आणि त्यानंतर दर ६–१२ महिन्यांनी

. हृदयविकार (Heart Conditions)
काही मुलांमध्ये जन्मतःच हृदयविकार असतो.
कोणाकडे सल्ला घ्यावा: बालहृदयरोगतज्ज्ञ (Pediatric Cardiologist)
कधी तपासणी करावी: जन्मानंतर लवकरच किंवा जर मुलाला दूध पिण्यात अडचण, थकवा किंवा दम लागणे जाणवत असेल

. ऐकण्याच्या अडचणी (Hearing Difficulties)
वारंवार कानाच्या संसर्गामुळे किंवा कानात पाणी साठल्यामुळे ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते.
कोणाकडे सल्ला घ्यावा: ENT तज्ज्ञ + श्रवणतज्ज्ञ (Audiologist)
कधी तपासणी करावी: जन्मानंतर काही महिन्यांत, व नंतर दर ६–१२ महिन्यांनी

. दृष्टिदोष (Vision Concerns)
नजीकदृष्टी (nearsightedness), मोतीबिंदू (cataract) किंवा भेंगा डोळे (strabismus) यांसारख्या समस्या होऊ शकतात.
कोणाकडे सल्ला घ्यावा: बाल नेत्ररोगतज्ज्ञ (Pediatric Ophthalmologist)
कधी तपासणी करावी: ६ महिन्यांपूर्वी प्रथम डोळ्यांची तपासणी

. ओरलमोटर अडचणी (Oro-motor Challenges)
दूध पिणे, चावणे किंवा बोलण्यात अडचण ही तोंडातील स्नायूंच्या टोनमधील फरकामुळे होऊ शकते.
कोणाकडे सल्ला घ्यावा: भाषावैज्ञानिक (Speech-Language Therapist) किंवा फीडिंग थेरपिस्ट
कधी तपासणी करावी: स्तनपान करताना अडचण, चावण्यास उशीर, किंवा अस्पष्ट बोलणं दिसल्यास

. कमी स्नायूबल (Low Muscle Tone / Hypotonia)
बसणे, चालणे, संतुलन व पोस्चरवर परिणाम होऊ शकतो.
कोणाकडे सल्ला घ्यावा: बालफिजिओथेरपिस्ट किंवा ऑक्युपेशनल थेरपिस्ट
कधी तपासणी करावी: जर बसण्यास, चालण्यास उशीर होत असेल

. झोपेच्या अडचणी (Sleep Disturbances)
स्लीप अ‍ॅप्निया सारख्या श्वसन अडचणींमुळे झोप पूर्ण होत नाही.
कोणाकडे सल्ला घ्यावा: बालरोगतज्ज्ञ किंवा स्लीप स्पेशालिस्ट
कधी तपासणी करावी: जर घोर घालणे, अस्वस्थ झोप किंवा दिवसा थकवा जाणवत असेल

. पाचनसंस्थेशी संबंधित तक्रारी (Digestive System Concerns)
जसे की बद्धकोष्ठता, अ‍ॅसिड रिफ्लक्स किंवा पचनासंबंधी संवेदनशीलता.
कोणाकडे सल्ला घ्यावा: बाल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट किंवा बालरोगतज्ज्ञ
कधी तपासणी करावी: जेव्हा खाण्यात अडचण, वारंवार पोटदुखी, किंवा वजन वाढत नसेल

१०. पायाची रचना व चालण्याच्या अडचणी (Foot Arch and Walking Challenges)
फ्लॅट फीट (पायाचा कमान नसणे) किंवा चालताना वेगळ्या प्रकारचा पाय ठेवण्याची पद्धत.
कोणाकडे सल्ला घ्यावा: फिजिओथेरपिस्ट किंवा ऑर्थोपेडिक तज्ज्ञ
कधी तपासणी करावी: जेव्हा मूल उभं राहू लागतं किंवा चालायला लागतो तेव्हा

तुम्ही आरोग्य तपासणीत सातत्य कसं ठेवू शकता?

  • आपल्या मुलाच्या वयानुसार एक आरोग्य तपासणी यादी (चेकलिस्ट) तयार करा
  • दर वर्षी आपल्या बालरोगतज्ज्ञाकडे आरोग्य पुनरावलोकन (health review) ठरवा
  • मुलाची वाढ, खाणंपिणं आणि झोपेच्या सवयी घरातच नियमितपणे लक्षात ठेवा
  • सर्व वैद्यकीय तपासणी अहवाल रेफरल्स एका फोल्डरमध्ये नीट ठेवून ठेवा
  • जर हालचाल, बोलणं किंवा शिकण्यात उशीर वाटत असेल, तर लवकर हस्तक्षेप सेवा (early intervention) घ्या

महत्त्वाची सूचना – आरोग्य तपासणीबद्दल

वरील काही लक्षणं इतर सामान्य मुलांमध्येही दिसू शकतात, आणि डाऊन सिंड्रोम असलेल्या प्रत्येक मुलामध्ये ही लक्षणं असतीलच असं नाही.
सर्वात महत्त्वाचं म्हणजेजागरूक राहणं, निरीक्षण करणं, आणि वेळेवर कृती करणं.

एक काळजीवाहक (caregiver) म्हणून जर तुम्हाला आपल्या मुलाच्या आरोग्यात किंवा विकासात काही बदल जाणवत असेल, किंवा शंका वाटत असेल, तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं नेहमीच योग्य असतं.

डाऊन सिंड्रोम हा आजार नाही आणि यावर कोणतंही “उपचार” नाही. पण योग्य मदत आणि पाठिंबा मिळाल्यास, प्रत्येक मूल भरपूर शिकू शकतं, आनंदी राहू शकतं आणि अर्थपूर्ण जीवन जगू शकतं.

आरोग्य तपासणी ही समस्या शोधण्यासाठी नसून, आपल्या मुलाच्या विकासासाठी योग्य वातावरण तयार करण्यासाठी असते.

आणखी मदतीसाठी –

जर तुम्हाला डाऊन सिंड्रोम, ऑटिझम, ADHD किंवा इतर विकासविषयक अडचणींबद्दल काही प्रश्न असतील, तर नयी दिशा (Nayi Disha) संघ तुमच्यासोबत आहे. फोन / व्हॉट्सॲप: 844-844-8996
भाषा: इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, तेलुगू, मल्याळम, बंगाली ही सेवा पूर्णपणे मोफत आणि गोपनीय आहे.

खालील गोष्टी मोफत उपलब्ध आहेत:

  • एक व्हिज्युअल माहितीपत्रक (infographic) – वर सांगितलेल्या मुद्द्यांचं संक्षिप्त चित्रमय स्वरूप
  • स्लाइड शो आणि व्हिडिओ – डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलांसाठी संवेदनक्षमतेचा (sensory) आधार कसा द्यावा, यावर माहिती

कृतज्ञता

डॉ. नीना पियुष वैद्य (बालरोगतज्ज्ञ) यांचे मार्गदर्शनासाठी मनापासून आभार. अनुवादासाठी श्रीमती राधिका गुडगुंतला आणि श्रीमती निवेदिता अग्रवाल यांचे आभार.

सूचना (Disclaimer)

ही माहिती शैक्षणिक उद्देशासाठी आहे. ही वैद्यकीय सल्ला नाही. कृपया तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Write Blog

Share your experiences with others like you!

English