Skip to main content

बौद्धिक अपंगत्व (Intellectual Disability – ID) म्हणजे काय? – एक सोपी माहितीपत्रिका

Default Avatar
Nayi Disha Team
Also available in: हिंदी
Like Icon 0Likes

Key Takeaways:

  1. बौद्धिक अपंगत्व (Intellectual Disability – ID) म्हणजे शिकणे, इतरांशी वागणं आणि रोजच्या आयुष्यातील कामं करण्यात अडचण येणं.
  2. हे साधारणतः वयाच्या ५ ते १८ या वयोगटात दिसून येतं आणि वेगवेगळ्या मुलांमध्ये याचा प्रभाव वेगवेगळा असतो.
  3. योग्य वेळेस मदत व थेरपी मिळाल्यास मुलं हळूहळू स्वावलंबी होऊ शकतात.
  4. कुटुंबाचा सहभाग म्हणजेच पालकांची साथ मुलांच्या विकासासाठी खूप महत्त्वाची असते.
  5. या प्रवासात मार्गदर्शन आणि  ही “बौद्धिक अपंगत्व (ID)” ची माहितीपत्रिका यात पालकांना आवश्यक गोष्टीबाबत माहिती देण्यात आली आहे मदतीसाठी तज्ज्ञ व उपयोगी साधनं उपलब्ध आहेत.

आपल्या मुलाला किंवा तुम्हाला ओळखीच्या एखाद्या मुलाला बौद्धिक अपंगत्व (ID) असल्याचं निदान झालं आहे का?
असं असेल, तर तुम्हाला सध्या अनेक भावना एकत्र येत असतील – गोंधळ, चिंता, भीती किंवा अनेक प्रश्न.

कदाचित तुम्ही हा शब्द पहिल्यांदाच ऐकत असाल किंवा थोडक्यात काही माहिती असेल. ही “बौद्धिक अपंगत्व (ID)” ची माहितीपत्रिका यात पालकांना आवश्यक गोष्टीबाबत माहिती देण्यात आली आहे 

बौद्धिक अपंगत्व (ID) म्हणजे काय?

बौद्धिक अपंगत्व (पूर्वी याला Mental Retardation – MR म्हणत, पण आता तो शब्द वापरात नाही) हे एक न्यूरो-डेव्हलपमेंटल (म्हणजे मेंदूच्या विकासाशी संबंधित) स्थिती आहे, ज्याचे निदान बालपणी होते, विशेषतः वयाच्या ५ ते १८ या दरम्यान.

यामध्ये मुलाच्या बौद्धिक क्षमतेसह दैनंदिन आयुष्यातील कौशल्यं, शाळेतील शिक्षण आणि इतरांशी वागणं यावर परिणाम होतो.
योग्य उपचार, थोडं मार्गदर्शन, साधनं आणि पालकांचा सक्रिय सहभाग यामुळे मुलं शिकू शकतात, स्वतःमध्ये सुधारणा करू शकतात आणि चांगलं, समाधानी जीवन जगू शकतात.

बौद्धिक अपंगत्वाची (ID) सुरुवातीची लक्षणं व चिन्हं

बौद्धिक अपंगत्वाची सुरुवातीची लक्षणं प्रत्येक मुलाच्या वयावर आणि विकासाच्या टप्प्यावर अवलंबून असतात.
खालील काही गोष्टी पालक, शिक्षक किंवा काळजीवाहक लक्षात घेऊ शकतात:

  • चालायला लागणं, बोलायला सुरुवात करणं, किंवा टॉयलेट ट्रेनिंग यामध्ये इतर मुलांपेक्षा उशीर होणं
  • सूचना समजून घेण्यात अडचण किंवा एखादं काम कसं करायचं हे लक्षात न येणं
  • बोलणं आणि संवाद साधण्यात अडचणी
  • स्वतः जेवण, कपडे घालणं, किंवा ठराविक दिनक्रम (routine) पाळणं यासारख्या मुलभूत गोष्टी शिकायला जास्त वेळ लागणं
  • इतर मुलांबरोबर खेळताना किंवा नव्या परिस्थितीत भावना सांभाळणं कठीण जाणं

 एक गोष्ट पालकांनी लक्षात घेतली पाहिजे तो म्हणजे प्रत्येक मुलाचा विकासाचा वेग वेगळा असतो.   पण जर वेळोवेळी एकापेक्षा जास्त बाबतीत अडचणी दिसत असतील, तर एकदा बालविकास तज्ञ (Developmental Pediatrician) किंवा बाल मानसोपचारतज्ञ (Child Psychologist) यांच्याशी बोलणं उपयुक्त ठरू शकतं.

बौद्धिक अपंगत्व (ID) होण्याची कारणं काय असतात?

बौद्धिक अपंगत्वाचं एकच ठोस कारण नसतं.  अनेक वेळा त्यामागचं नेमकं कारण समजणंही कठीण असतं.
तरीही काही शक्य तिथे दिसणारी कारणं खाली दिली आहेत:

  • जिनेटिक स्थिती – जसं की डाउन सिंड्रोम किंवा फ्रॅजाईल X सिंड्रोम
  • गर्भधारणेदरम्यान किंवा बाळाच्या जन्मावेळी आलेल्या गुंतागुंती – उदा. जन्मावेळी ऑक्सिजन कमी मिळणं
  • लहानपणी झालेल्या सिरियस इन्फेक्शन किंवा गंभीर आजारपण
  • डोक्याला झालेली इजा /दुखापत किंवा शिसं (lead) सारख्या घातक रसायनांचा संपर्क

    लक्षात घ्याबौद्धिक अपंगत्व वाईट पालकत्वामुळे होत नाही.  कोणतीही चूक मुलाची किंवा पालकांची नसते.  हे मेंदूशी संबंधित फरक असतात – ज्यांना समजून घेणं आणि स्वीकारणं गरजेचं आहे, दोष देणं नव्हे.

बौद्धिक अपंगत्व (ID) चे निदान कसं केलं जातं?

बौद्धिक अपंगत्वाचं निदान फक्त एका चाचणीवर आधारित नसतं. यासाठी विविध प्रकारच्या मुलांच्या मूल्यांकनांचा वापर केला जातो:

  • विकास मूल्यांकन (Developmental Assessments): मुलं शारीरिक, भावनिक आणि सामाजिक पातळीवर त्यांचं वयपातळीप्रमाणे कशी प्रगती करत आहेत, हे पाहिलं जातं.
  • बौद्धिक क्षमता चाचणी (IQ Test): या चाचणीत मुलांची विचार करण्याची आणि शिकण्याची क्षमता तपासली जाते. (मात्र, लक्षात ठेवा – कोणतीही एक चाचणी मुलाची किंमत किंवा क्षमता ठरवत नाही.)
  • दैनंदिन जीवनातील कौशल्य मूल्यांकन (Adaptive Behavior Assessments): स्वतःची काळजी घेणं, संवाद साधणं आणि दैनंदिन कामं कशी हाताळतात, हे बघितलं जातं.

लवकर निदान का महत्वाचं आहे?

लवकर ओळख होणं (early diagnosis) म्हणजे वेळेवर योग्य मदत मिळणं आणि मुलाला समजून घेण्याची संधी मिळणं.  हे पालक, शिक्षक आणि काळजीवाहकांना मुलाच्या गरजा नीट समजून घेण्यासाठी खूप मदत करतं. 

  • मुलाला त्याच्या गतीने जीवनातल्या महत्वाच्या कौशल्यांचा विकास करता येतो
  • अपेक्षा समजून घेतल्या की पालक आणि मुलाचं ताण-तणाव कमी होतो
  • मुलाला स्वतःबद्दल नकारात्मक भावना (जसं की मी काहीच करू शकत नाही) येण्यापासून थांबवता येतं
  • शाळा आणि समाज मुलासाठी योग्य बदल करू शकतो – जसं की विशेष मदत, साधनं, आणि समावेश
  • पालकांसाठी एक नेटवर्क तयार करता येते जस की पॅरेण्ट सपोर्ट ग्रुप , व्यवसायिक तज्ज्ञ , विशेष शिक्षक जे त्यांना त्यांच्या मुलासाठी योग्य मार्गदर्शन करू शकतं

    लवकर मदत घेणं म्हणजे मुलाला शिक्का मारणं नाही  तर त्याला नीट समजून घेणं आणि जाणीवपूर्वक, प्रेमाने आणि काळजीने त्याच्या सोबत चालणं आहे.

बौद्धिक अपंगत्वामुळे प्रभावित होणाऱ्या काही मुख्य बाबी:

बौद्धिक अपंगत्वामुळे मुलाच्या आयुष्यातील काही गोष्टींवर परिणाम होऊ  शकतो. यामध्ये हे समाविष्ट असू शकतात:

बौद्धिक कौशल्य (Cognitive Skills):
नवीन गोष्टी शिकणं, विचार करण्याची क्षमता, लक्ष देणं आणि आठवण ठेवणं

भाषा आणि संवाद (Language & Communication):
दुसऱ्यांचं समजून घेणं, स्वतःच्या गरजा आणि भावना व्यक्त करणं

सामाजिक आणि भावनिक कौशल्य (Social & Emotional Skills):
मैत्री निर्माण करणं, भावना समजून घेणं, सामाजिक नियम समजणं

दैनंदिन जीवन कौशल्य (Daily Living Skills):
स्वतः कपडे घालणं, खाणं-पिणं, स्वच्छता राखणं, दिनक्रम पाळणं

पण यासोबतच अशा मुलांमध्ये अद्वितीय गुण म्हणजे  त्यांची ताकद (strength )असतात – जसं की प्रेमळ स्वभाव, कल्पकता, चिकाटी, विनोदबुद्धी,किंवा स्वतःला सुरक्षित वाटणाऱ्या लोकांशी  मनापासून नातं जोडण्याची इच्छा . निदान म्हणजे आपल्या मुलात काहीतरी बदल झाला असं नाही तर फक्त आपण त्याचं जग थोडं अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊ लागलोय. जेव्हा आपल्याला त्याचं जग नीट समजतं,तेव्हा आपण आधार देण्यासाठी अधिक आत्मविश्वासाने, स्पष्टतेने आणि माया-समजुतीने पुढे जाऊ शकतो.

हे लक्षात ठेवा की बौद्धिक अपंगत्व (ID) म्हणजे कुठलाही कायमचा अडथळा नाही , तर शिकण्याचा आणि जगाशी जोडण्याचा एक वेगळा मार्ग आहे.  मुलांना योग्य वेळ, जागा आणि आधार दिला की ते नक्कीच शिकतात, वाढतात, फुलतात. कधी वेळ लागतो, कधी वेगळी शिकवण्याची पद्धत लागते,  पण याचा अर्थ असा नाही की मुलं शिकू शकत नाहीत.

छोट्या छोट्या प्रगतीचं कौतुक करा. मुलाचं प्रत्येक पाऊल – अगदी लहान वाटलं तरी हीच वाढीची खूण आहे. त्याच्या गुणांवर, आवडीनिवडींवर आणि जे त्याला आनंद देतं त्यावर लक्ष केंद्रित करा. संगीत असो, हालचाल, चित्रकला किंवा दिनक्रम  या सगळ्या गोष्टी आपल्या मुलाशी नातं जोडण्याचे आणि शिकवण्याचे सुंदर मार्ग बनू शकतात.

हो, आव्हानं असतील.  ID असलेल्या मुलाचं पालनपोषण करायचं म्हणजे काही खास अडचणी येतात  पण त्याचबरोबर काही अप्रत्यक्ष पण हृदयस्पर्शी क्षणही मिळतात – प्रेम, समजूत, आणि चिकाटीचे.

तुम्ही या प्रवासात एकटे नाही. योग्य मार्गदर्शन आणि समुदायाच्या मदतीने,  तुम्ही आणि तुमचं मूल मिळून एक अर्थपूर्ण, आधाराने भरलेलं आयुष्य घडवू शकता.

कृतज्ञता:

या बौद्धिक अपंगत्व (ID) माहितीपत्रकाच्या तयारीसाठी मार्गदर्शन व तज्ज्ञ सल्ला दिल्याबद्दल आम्ही डॉ. सना स्मृती, न्युरो-डेव्हलपमेंटल पेडियाट्रिशियन यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

आमची  पालकांना विनंती आहे की वर दिलेलं बौद्धिक अपंगत्व (ID) माहितीपत्रक नक्की वाचा. यामध्ये  सुरुवातीची लक्षणं , मुलांच्या strength नुसार आधार ,उपलब्ध थेरपीज आणि मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोगी मार्गदर्शन असं सगळं सहज समजेल अशा भाषेत दिलं आहे.

जर तुम्हाला ऑटिझम, डाउन सिंड्रोम, ADHD किंवा इतर बौद्धिक अपंगत्वांबाबत काही शंका असतील,
किंवा एखाद्या मुलाच्या विकासात उशीर होतोय असं वाटत असेल,  तर नई दिशा टीम तुमच्या मदतीसाठी आहे.कुठल्याही प्रश्नांसाठी किंवा मार्गदर्शनासाठी,  कृपया आमच्या मोफत हेल्पलाइन क्रमांकावर – 844-844-8996  कॉल किंवा व्हॉट्सॲप करा.

आमचे समुपदेशक हिंदी, मराठी, इंग्रजी, मल्याळम, गुजराती, तेलुगू आणि बंगाली भाषांमध्ये उपलब्ध आहेत

टीप:

हे माहितीपत्रक केवळ जनजागृती आणि सामान्य माहिती देण्यासाठी तयार करण्यात आले आहे.
हे कोणतेही निदान (Diagnosis) करणारे साधन नाही. कृपया नेहमी एखाद्या प्रशिक्षित आरोग्य तज्ज्ञाचा सल्ला घ्या.

Tags:
Write Blog

Share your experiences with others like you!

No Related Resources Found.

No Related Services Found.
English